पनवेल : रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य विलास नारायण फडके यांनी आपला जन्मदिन समाज उपयोगी कार्यक्रमांतून साजरा केला. कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे जनमानस हवालदील झाले आहे. भयभीत जनतेला धीर देण्याच्या उद्देशाने विलास फडके यांनी त्यांच्या जन्मदिनी आर्सेनिक अल्बम गोळ्या,मास्क, सेनीटायझर, अन्नधान्य यांचे वाटप केले.
विलास फडके यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आर्सेनिक अल्बम गोळ्या,मास्क, सेनीटायझर आणि Covid 19उच्चाटनासाठी माहितीपत्रक असे किट बनवून ते किट गावोगावी पाठविण्यात आली. सामाजिक अंतर राखून प्रत्येक ठिकाणी त्या-त्या गावातील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या साहित्याचे वाटप केले. तब्बल 5000 कुटुंबांना हे अत्यंत महत्त्वाचे साहित्य प्रदान करण्यात आले. विलास फडके यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी चार दिवस अगोदर म्हणजे रविवार सकाळपासून आजूबाजूच्या गावांत साहित्य वाटपास सुरुवात केली होती. तालुक्यातील हरिग्राम, नेरेपाडा आदी गावातील आदिवासी बांधवाना धान्य वाटप, स्नेहकुंज आश्रम, सील आश्रम, करुणेश्वर आश्रम येथे मास्क, सॅनिटायजर आणि गोळ्यांचे वाटप करण्यात आले. आर्सेनिक एल्बम थर्टी या होमिओपॅथिक गोळ्यांच्या सेवनाने परिसरातील नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होणार आहे. तसेच आता शेतीच्या कामांनी जोर धरला असल्याकारणाने शेतावर आणि घरी वापरण्यासाठी मास्क, सेनीटायझर अत्यावश्यक आहेत. या सोबतच नागरिकांनी काय करावे आणि काय करू नये या आशयाचे पत्रक आम्ही घरोघरी वाटले आहे. Covid 19 उच्चाटनासाठी आम्ही जनजागृती करत असून जास्तीत जास्त नागरिकांनी निरोगी रहावे यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे विलास फडके यांनी सांगितले.