पुणे प्रतिनिधी-
परीट संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणे भारत चे संचालक चेतन शिंदे यांनी परीट/धोबी समाजातील समाजसेवक आणि लॉंड्री व्यावसायिकांना भासणाऱ्या अडचणी व पुढील आठवड्यामध्ये परीट संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, भारत च्या वतीने जी समाजबांधवांना मदत केली जाणार आहे त्यामध्ये नेमकी कोणती आवश्यक मदत करण्यात यावी हे जाणुन घेणेसाठी त्यांनी पुणे ते नागपुर असा दि.४ जुलै ते ९ जुलै दौरा केला.
दौऱ्यादरम्यान त्यांनी दौंड(पुणे) आणि काष्टी(अहमदनगर),जालना,वाशिम, यवतमाळ तसेच नागपुर येथे समाज बांधव, लॉंड्री व्यवसायिक व धोबी घाटाला भेटी दिल्या.
या भेटी दरम्यान चेतन शिंदे यांनी सांगितले की धोबी समाजातल्या लॉंड्री व्यावसायिकांना आपल्या व्यवसायाकरता लागणाऱ्या व बाजारामध्ये येणाऱ्या नवनवीन मशनरिंबाबत परीट संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, भारत च्या वतीने आपल्या संपूर्ण महाराष्ट्र मध्ये तसेच राज्याच्या बाहेर ही संपूर्ण देशभर मशनरिंची माहिती, देण्याचे तसेच या मशनरी चालवण्याबाबतचे प्रशिक्षण देण्याचे काम संस्थेमार्फत तज्ञ लोकांना सोबत घेऊन चालू आहे तसेच बँक कडून व्यावसायिकांना जो कर्ज पुरवठा होत आहे त्यासाठी लागणारी कागदपत्रे व कर्ज मंजूर करून घेणेबाबतचा पाठपुरावा धोबी समाजातील बांधवांकरता संस्था करत आहे... तसेच धोबी समाजाची शिरगणना म्हणजे समाज संख्या मोजणी करण्याचे कामही संस्थेच्या वतीने चालू आहे आणि संस्थेच्या वतीने राज्यातील समाजसेवकांची मदत घेऊन शिरगणना पूर्ण करणार आहोत असे यावेळी चेतन भाऊ यांनी सांगितले.
व्यवसायाकरता आवश्यक असलेल्या कर्ज मंजूरी करता आपल्याला व्यवसायाचे उद्योग आधार कार्ड ची आवश्यकता भासत आहे आणि नागरी सुविधा केंद्र अथवा नेट कॅफे मध्ये उद्योग आधारकार्ड काढायला एखादा बांधव गेला तर त्यांकडून तिथे (उद्योग आधार कार्ड काढायला नाममात्र किरकोळ खर्च होत असताना) अव्वाच्या सव्वा पैसे घेतले जात आहेत आणि अशाप्रकारे तिथे जाऊन पैसे खर्च करणेपेक्षा काहीही खर्च न होता आपल्याच मोबाईल अथवा आपल्या काँप्युटर मधून आपण उद्योग कार्ड काढावे, आणि ते उद्योग आधार कार्ड कसे काढावे त्याबाबत चेतन शिंदे यांनी त्यांच्याकडील लॅपटॉपवर फॉर्म भरून दाखवले व समजावून सांगितले जेणेकरून आपल्या बांधवांची आर्थिक बचत होईल.
चेतन शिंदे हे दौंड मध्ये आले त्यावेळी दौंड येथील समाजसेवक- दौंड शहर परीट (धोबी) समाज संघटनेचे माजी अध्यक्ष गणेश शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले तसेच त्यांचा सत्कार केला. तसेच काष्टी येथे झालेल्या चर्चा मीटिंग वेळी धोबी समाजाचे नगर जिल्ह्याचे नेते काष्टी, ता. श्रीगोंदा येथील समाजसेवक रविंद्र क्षीरसागर आणि अहमदनगर जिल्हा परीट (धोबी) समाज संघटनेचे अध्यक्ष गणेश कदम यांनी चेतन शिंदे यांचा सत्कार केला तसेच त्यांचे आभार मानले.
काष्टी येथे यावेळी बारा बलुतेदार महासंघाचे नगर जिल्हा (युवा) अध्यक्ष अजय रंधवे, कर्जत तालुका परीट (धोबी) समाज संघटनेचे अध्यक्ष संतोष केरु दळवी, आणि समाज संघटनेचे सचिव संदिप आढाव इ. उपस्थित होते.
त्यापुढे परीट संधोधन आणि प्रशिक्षण संस्था, भारत चे संचालक चेतन शिंदे हे ज्यावेळी आसेगाव, जि. वाशिम येथे गेले तेव्हा तेथे कार्यरत असलेले (नांदेड चे धोबी समाजाचे भूषण) सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी लष्करे यांनी त्यांचे स्वागत केले तसेच सत्कार केला.
त्यानंतर चेतन शिंदे हे आपल्या दौर्यादरम्यान नागपुर येथील धोबी समाजबांधव व लॉंड्री व्यावसायिक बांधवांकडे गेले, यावेळी येथील बांधवांना त्यांनी परीट संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, भारत च्या माध्यमातून संपूर्ण राज्यात आपल्या समाजाकरता करत असलेल्या कार्याबाबत माहिती दिली. तसेच राज्यातील आपल्या धोबी समाजातील तरुण पिढीला आपल्याच पिढानपिढ्या चालत आलेल्या व्यवसायातुन संगणक व मशनरींच्या युगात स्वयंरोजगार प्राप्त व्हावा आणि आपला समाजबांधव यशस्वी उद्योजक म्हणुन ताठ मानेने जगता यावे याकरिता केंद्र व राज्यसरकारच्या अनेक योजना ज्यांची माहिती सर्वसामान्य समाजबांधव, लॉंड्री व्यावसायिक, सुशिक्षित तरुण, यांच्यापर्यंत पोहचावी या हेतुने परीट संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, भारत प्रयत्नशील असल्याचे चेतन शिंदे यांनी सांगितले. राज्यातील सर्व जिल्हा, तालुका, लॉन्ड्री व्यवसाय करणाऱ्या समाजबांधवांपर्यंत 'रोजगार व स्वयंरोजगार अभियाना' बद्दलची माहिती पोहचवण्याकरता चेतन भाऊ शिंदे यांचे काम चालु आहे. नागपुर येथे २ दिवस त्यांनी तेथील समाजसेवक आणि धोबी समाजातील लॉंड्री व्यावसायिकांच्या भेटी घेतल्या, तेथील धोबी घाटाची परिस्थिती त्यांनी जाणुन घेतली.
या दरम्यान त्यांचेसोबत नागपूर येथील समाजसेवक- धोबी समाजाचे राज्याचे नेते दिलीप शिरपुरकर होते, त्यांनी समाजबांधवांना सांगितले की, परीट संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, भारत या संस्थेद्वारे समाजबांधवांनी प्रशिक्षण घेतल्यास त्यांना व्यवसायिक मार्गदर्शन मिळेल, तसेच सदर प्रशिक्षणाच्या आधारे रोजगार व स्वयंरोजगार प्राप्त करण्यास अत्यंत मोलाचे सहकार्य होईल. समाजातील उद्योजकांना शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या लाभाच्या योजना समाज बांधवांपर्यंत पोहचवण्याचे तसेच शासनाकडून होत असलेल्या कर्ज पुरवठ्याबाबत माहिती तसेच यासाठी आवश्यक ती सर्व मदत संस्था करेल.
गॅस सिलेंडर प्रेस ला लागणारे भांडवल मासिक हप्त्यावर परीट संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे,भारत द्वारा समाजबांधवांना उपलब्ध करून द्यावे याचे संस्थेने नियोजन करावे असे दिलीप शिरपुरकर यांनी चेतन शिंदे यांचे सोबत सविस्तर चर्चा करून माहिती दिली आणि परीट संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, भारत या कामात समाजबांधवांना सहकार्य करेल असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. धोबी घाट नागपूर येथे बाहेरचे अतिक्रमण होत आहे व याबाबत मार्ग काढणे व त्याचे नियोजनाबाबतही यावेळी चर्चा झाली.
नागपूर येथील या भेटी दरम्यान- येत्या काही दिवसात परीट संशोधन आणि प्रशिक्षण संस्था भारत च्या वतीने नागपुर मध्ये लाँड्री व्यावसायिक, तसेच सुशिक्षित बांधवांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम घेण्यात येईल याविषयी चर्चा झाली.
नागपुर महानगरपालिकेच्या ५ लक्ष निधीतून प्रथमच नागपुर मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात आलेल्या कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या तैलचित्रास चेतन शिंदे यांनी भेट दिली व गाडगेबाबा यांचे दर्शन घेतले. तसेच नागपूर येथील दिलीप शिरपुरकर आणि स्थानिक समाज सेवक यांचे प्रयत्नातून झालेल्या कार्याबाबत त्यांनी अभिनंदन केले.