पनवेल दि.20 जून
मिशन बिगिन अगेन अंतर्गत लाॅकडाऊन शिथील झाल्यापासून नागरिक मुक्त झाल्यासारखे दिसत आहेत. मात्र लाॅकडाऊन शिथील करताना सोशल डिस्टंसिंग पालन करणे व कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी मास्क व सॅनिटायझर्स यांचा वापर करणे अत्यावश्यक आहे. तसेच गर्दी न करता दैनंदिन जीवन सुरळीत करणे अपेक्षित आहे.
परंतु या बाबींचे भान ठेवता काही विक्रेते बेजबाबदारपणे वागत असल्याने व दिवसेंदिवस पनवेल मनपा हद्दीत कोरोना रूग्ण वाढत आहेत हे पाहता आयुक्त सुधाकर देशमुख यांनी अशा दुकानदारांवर सक्त कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
त्याचाच भाग म्हणून आज उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्या नियंत्रणाखाली चारही प्रभागात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सम-विषम तारखांना दुकाने उघडे ठेवण्यासाठी जे नियम ,अटी शर्थीचे उल्लंघन करणा-या दुकानांवर कारवाई करण्यात आली.
एकूण 32 दुकांदारावर कारवाई करण्यात आली.
अ प्रभाग, खारघर 8
ब प्रभाग , कळंबोली 4
क प्रभाग, कामोठे 13
ड प्रभाग, पनवेल 7
अशी एकूण 32 दुकानावर कारवाई करणेत आली. संबंधित प्रभागातील प्रभाग अधिकारी अनुक्रमे श्री. दशरथ भंडारी, श्री. प्रकाश गायकवाड, श्री. अरूण कोळी व श्री. सदाशिव कवठे यांच्या पथकांनी ही कारवाई केली.
अतिक्रमण पथकांमार्फत आता रोजच ही कारवाई केली जाणार आहे. सोशल डिस्टंसिंग पालन न करणा-या दुकानांवर साथरोग अधिनियम 1897 नुसार गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. अशी गर्दी करून कोरोना संसर्ग पसरवू शकणा-या दुकानांत जाऊ नये, सोशल डिस्टंसिंगचे कडक पालन करावे असे आवाहन उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी केले आहे.