जागतिक आरोग्य संघटनेने "जागतिक महामारी" म्हणून घोषित केलेल्या कोव्हीड 19 विषाणूमुळे होणा-या आजाराशी संपूर्ण जग लढत आहे. अशावेळी नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य सेवेतील जे अधिकारी, कर्मचारी कोव्हीड 19 शी संबंधित काम करीत असताना दुर्दैवीरित्या मृत्यूमुखी पडतात त्यांच्या वारसांना 75 लक्ष रक्कमेपर्यंत तसेच इतर विभागातील कोरोनाशी संबंधित काम करताना मृत्यू पावलेल्या अधिकारी, कर्मचारी यांच्या वारसांना 50 लक्ष रक्कमेचे "विशेष सानुग्रह अनुदान" देण्याचा महत्वपूर्ण निर्णय महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी घेतलेला आहे. तशा प्रकारचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
या योजनेअंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य सेवेतील (हेल्थ केअर फॅसिलिटीज्) कोव्हीड-19 या साथरोग संबंधात काम करत असलेल्या कोरोना योध्यांना कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊन दुर्दैवी मृत्यू ओढवल्यास अथवा कोव्हिड-19 संबंधात कर्तव्यावर असताना अपघाती मृत्यू झाल्यास मृत कर्मचा-याच्या वारसास केंद्र सरकारच्या 'प्रधान मंत्री गरीब कल्याण पॅकेज : इन्शुरन्स स्कीम फॉर हेल्थ वर्कर्स फाईटींग कोव्हीड-19' या योजने अंतर्गत रु.50 लक्ष रकमेचे 'सुरक्षा विमा कवच' पुरविण्यात आले आहे. यामध्ये महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या "कामगार कल्याण निधी"मधून "विशेष सानुग्रह अनुदान" म्हणून रू. 25 लक्ष रक्कम देण्याचे निश्चित केले असून एकूण रू. 75 लक्ष रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट 'क' व 'ड' मधील कायम कर्मचा-यांच्या पात्र वारसास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या 29 मे 2020 रोजीच्या शासन निर्णयाव्दारे सूचित करण्यात आल्यानुसार आरोग्य सेवेव्यतिरिक्त महानगरपालिका आस्थापनेवरील जे अधिकारी, कर्मचारी कोरोना विषयक सर्वेक्षण, शोध, माग काढणे, प्रतिबंध, चाचणी, उपचार व मदतकार्य या कार्यवाहीच्या कर्तव्यावर असणा-या अधिकारी, कर्मचारी यांचा कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊन दुर्देवी मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना महानगरपालिकेच्या "कामगार कल्याण निधी"तून रुपये 50 लक्ष रक्कमेचे "विशेष सानुग्रह अनुदान" देण्याचे तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट 'क' व 'ड' मधील कायम कर्मचा-यांच्या पात्र वारसास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे.
सध्या केंद्र शासनाने "राष्ट्रीय स्वास्थ मिशन" अंतर्गत कोव्हीड 19 शी लढणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रुग्णालये (हेल्थ केअर सुविधा) येथे कार्यरत नियमित कर्मचारी / सेवानिवृत्त कर्मचारी / कंत्राटी कर्मचारी / रोजंदारीवरील कर्मचारी / बाह्य यंत्रणेव्दारे उपलब्ध करून घेतलेले कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी कर्मचारी यांना "प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज" अंतर्गत "सुरक्षा विमा कवच" पुरविले आहे. हे विमा संरक्षण कोव्हीड 19 बाधितांवर तपासणी व उपचार करणा-या सर्व संबंधितांना अनुज्ञेय असणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीबाबत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांनी 11 एप्रिल 2020 च्या पत्राव्दारे सूचित केल्याप्रमाणे, संबंधित व्यक्तीच्या कुटुंबाला न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या अपघात विमा योजनेमार्फत रु. 50 लक्ष इतकी रक्कम अनुज्ञेय असणार आहे. ही विमा रक्कम लाभार्थ्यांना मिळण्यासाठी विमा धारकाचा मृत्यू हा कोव्हीड 19 बाधीत झाल्यामुळे व या कामाशी संबंधित असल्यामुळे झाला असल्याचे प्रमाणित करणे आवश्यक आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या हेल्थ केअर सुविधा (जीएच, एमसीएच, यूएचपी, सीसीसी, डीसीएससी, डीसीएच आणि क्वारंटाईन / आयसोलेशन सेंटर्स) याठिकाणी कार्यरत कर्मचा-यांव्यतिरिक्त कोरोना विषाणू साथीच्या अनुषंगाने संपर्क शोधणे व सर्वेक्षण करणे तसेच शोध, माग काढणे आणि प्रतिबंध, चाचणी, उपचार, मदतकार्य व कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक किटक नाशकांची (Disinfectants) फवारणी करणे त्याचप्रमाणे कोव्हीड 19 प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या कोणत्याही कामाकरिता महानगरपालिकेच्या कोणत्याही विभागाने नियुक्त केलेले अथवा काम करीत असलेले महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील नियमित स्वरुपाचे अथवा करार / मानधन / वेतनश्रेणीवर नियु्क्त तात्पुरत्या स्वरुपातील कंत्राटी कर्मचारी / तदर्थ / रोजंदारी / मानसेवी तसेच बाह्य यंत्रणेव्दारे नियुक्त कर्मचारी यांना महानगरपालिकेच्या कामगार कल्याण निधीमधून रु. 50 लक्ष इतके विशेष सानुग्रह अनुदान देण्याचे महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी या परिपत्रकाव्दारे जाहीर केले आहे.
जे कर्मचारी इस्पितळात दाखल होण्याच्या अथवा मृत्यूच्या दिनांकापूर्वी 14 दिवसांच्या काळात कर्तव्यावर हजर आहेत व तसे संबंधित विभागप्रमुख यांनी सत्यापित प्रमाणित केले आहे अशाच कर्मचा-यांना हे "विशेष सानुग्रह अनुदान" लागू असणार आहे. याकरिता सदर मृत्यू कोव्हीड 19 शी संबंधित असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र शासकीय / पालिका / महानगरपालिका, आयसीएमआर नोंदणीकृत खाजगी रुग्णालये / प्रयोगशाळा यांचेकडून प्राप्त अहवालाच्या आधारे करणे आवश्यक असणार आहे. "विशेष सानुग्रह अनुदान" या योजनेचा लाभ ज्यांना "प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज" ही योजना लागू असणार आहे अशा कर्मचा-यांना व शासनाच्या योजनेत सुधारणा होऊन ज्या प्रकारच्या कोणत्याही कर्मचा-याचा समावेश होईल अशा कर्मचा-यांना लागू होणार नाही.
या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी प्राप्त प्रकरणांची छाननी करण्याकरीता अतिरिक्त आयुक्त (2) यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत करण्यात आली असून त्या समितीचे प्रशासन विभागाचे उपआयुक्त हे सदस्य सचिव असणार आहेत. तसेच मुख्य लेखा व वित्त अधिकारी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मु्ख्य लेखा परीक्षक आणि संबंधित अधिकारी / कर्मचारी ज्या विभागात कार्यरत आहे त्या विभागाचे विभागप्रमुख हे सदस्य असणार आहेत. ही समिती त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या प्रस्तावांच्या संदर्भात छाननी करून महापालिका आयुक्त यांच्याकडे योजनेचा लाभ देण्यासाठी शिफारस करेल.
कोव्हीड 19 विषाणू विरोधातील लढ्यात सर्वेक्षण, तपासणी, उपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी आत्मियतेने काम करणा-या नवी मुंबई महानगरपालिका व परिवहन सेवेच्या कोरोना योध्यांसाठी "सुरक्षा विमा कवच योजना" कार्यान्वित करून साथरोग अधिनियम, 1897 च्या अनुषंगाने उपाययोजना करण्यासाठी 'सक्षम प्राधिकारी' म्हणून महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी घेतलेल्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे कोरोनायोध्यांचे मनोबल उंचावले आहे.