गणपती विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणावर कृत्रिम तलाव बनवण्याची गरज- विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
पनवेल : सध्या सणांचे दिवस सुरू झाले आहेत. गणेशोत्सव देखील काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहे. गणपती बाप्पांच्या आगमनासाठी सगळेच आतुर झालेले आहेत. बाप्पांच्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी प
नवेल महापालिका हद्दीत कृत्रिम तलावांची संख्या हातावर बोटे मोजण्या इतकी आहे. त्यामुळे पालिका हद्दीत कृत्रिम तलावांची संख्या वाढविण्याची गरज असल्याचे महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी सांगितले आहे. तसेच गणपती विसर्जन करता विसर्जन आपल्या दारी ही संकल्पना राबविण्याची गरज असल्याचे नगरसेविका डॉ.सुरेखा मोहोकर यांनी सुचविले आहे.
22 ऑगस्ट रोजी घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन होत आहे. या वर्षी कोरोना च्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधे पणाने साजरा करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शासनाने देखील तशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. पनवेल महापालिका हद्दीत तळोजा, कामोठे, खारघर, कळंबोली, खांदा कॉलनी, नवीन पनवेल, पनवेल आदी परिसरात घरोघरी लाखो खासगी आणि शेकडोंच्या संख्येने सार्वजनिक गणपतींचे आगमन घरोघरी होते. दरवर्षी नदी, तलाव यामध्ये बाप्पांचे विसर्जन केले जाते.
नदी किंवा तलावात बाप्पांचे विसर्जन केल्यानंतर पाण्याचे प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी येत आहेत.तसेच काही ठिकाणी काही दिवसांनी मूर्तींचे भग्नावशेष दिसून हेत आहेत. त्यामुळे या वर्षी श्रीगणेश उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सर्व मंडळांनी सहकार्य करावे. मूर्तीची उंची कमी ठेवावी सामाजिक अंतराच्या नियमांचे काटेकोर पणे पालन करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका आणि नवी मुंबई -पनवेल पोलीस निर्विघ्नपणे उत्सव साजरा होण्या करता नियोजन करत आहे. गणेश मूर्ती दुकानातून घरी आणताना आणि विसर्जन करताना कमीतकमी व्यक्तींनी यावे, असे आवाहन करण्यात येत आहे. पनवेल महापालिका हद्दीत या वर्षी मोठ्या प्रमाणात कृत्रिम तलाव बनवण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी केली आहे. कृत्रिम तलावाच्या निर्मितीसाठी स्वयंसेवी संस्था, गणेशोत्सव मंडळे यांनी पुढाकार घ्यावा असे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी आवाहन केले आहे. त्यामुळे अशा कृत्रिम तलावांची श्री गणेशा च्या आगमनापूर्वी व्हावी असे प्रितम म्हात्रे यांचे म्हणणे आहे. तसेच यावेळी निर्माल्याचे ओले आणि सुके असे संकलन करणे, त्याची योग्य विल्हेवाट लावणे, हार आणि फुले व पूजा साहित्य पाण्यात टाकले जाणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी केले आहे.
पनवेल महापालिका हद्दीत मोठ्या प्रमाणावर कृत्रिम तलाव बनवण्याची गरज आहे. विविध संस्था, गणेश मंडळे यांनी यात सहभाग घ्यावा. पालिकेने त्यांना प्रोत्साहित करावे. आणि जास्तीत जास्त नागरिकांनी गणेश मूर्ती विसर्जन न करता मूर्तीकाराना दान करावी. -प्रितम म्हात्रे, विरोधी पक्ष नेता, पनवेल महापालिका