पनवेल : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पनवेल महापालिकेने एक पाऊल पुढे टाकत अखेर महापालिका क्षेत्रात 3 जुलैच्या मध्यरात्रीपासून 13 जुलैपर्यंत कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश आयुक्त सुधाकर देशमुख यांनी काढले आहेत. पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे आणि आमदार बालाराम पाटिल यांनी पनवेल महापालिका क्षेत्रात लॉकडाऊन करण्याची मागणी केलेली होती. त्यांच्या मागणीला यश आले आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात दररोज शंभर रूग्ण सापडून येत होते. वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पनवेल परिसरात कडक नियोजन करण्यासाठी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख याना पनवेल महापालिका हददित लॉक डाऊन करण्याची मागणी केली होती. महापालिका आयुक्त देशमुख यांनी पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये दिनांक ३ जुलै २०२० रोजी रात्री ९ वाजलेपासून ते दिनांक १४ जुलै २०२० रोजी सकाळी ५ वाजेपर्यंत पूर्णपणे लॉकडाऊन जाहीर केला आहे. दिवसागणिक पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोनाचे रुग्ण अधिक सापडू लागले आहेत. त्यामुळे भयावह स्थिती निर्माण झालेली आहे. मार्केटमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी घराबाहेर पडताना दिसत आहेत. त्यामुळे बाजारात मोठी गर्दी होत आहे. तसेच वाहनांची देखील वर्दळ वाढलेली असल्याने वाहतूक कोंडी सतावू लागली आहे. विविध ठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढू लागलेला आहे. त्यामुळे पनवेल महानगरपालिका हद्दीत महापालिकेच्या वतीने लॉकडाऊन करण्यात यावे अशी मागणी पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी आयुक्तांकडे केली होती. यासाठी पाठपुरावा देखील करण्यात आला होता. त्यांच्याकडे पाठपुरावा केल्याने देशमुख यांनी पनवेल महापालिका हददित बंदचा निर्णय घेतला आहे.
सदर लॉकडाऊन काळात नागरीकांनी शिस्तीचे पालन करून कोरोनाची साखळी खंडित करणे गरजेचे आहे. आपल्या सर्वांच्या निरोगी आयुष्यासाठी व कोरोनावर पूर्णपणे मात करण्यासाठी आपण सर्वानी घरातच थांबणे आवश्यक आहे. तरी अत्यावश्यक काम असल्याशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये -प्रितम म्हात्रे, विरोधी पक्षनेते, पनवेल महानगरपालिका